नीतिवचनं २९:१-२७

  • मोकाट सोडलेला मुलगा खाली पाहायला लावतो (१५)

  • देवाकडून मार्गदर्शन नसलं, की लोक अंदाधुंदपणे वागतात (१८)

  • तापट माणूस वाद सुरू करतो (२२)

  • नम्र माणसाचा गौरव होतो (२३)

  • माणसांची भीती पाश ठरते (२५)

२९  बरंच ताडन दिल्यावरही जो माणूस आपला हट्ट सोडत नाही,+तो अचानक असा चिरडला जाईल, की पुन्हा कधीच उठणार नाही.+  २  नीतिमान पुष्कळ असतात, तेव्हा लोक जल्लोष करतात;पण दुष्ट सत्ता चालवतो, तेव्हा ते कण्हू लागतात.+  ३  जो बुद्धीवर प्रेम करतो, त्याच्या वडिलांना त्याच्यामुळे आनंद होतो,+पण जो वेश्‍यांची संगत धरतो, तो आपली संपत्ती उधळून टाकतो.+  ४  न्यायामुळे राजा देशात शांती आणतो,+पण लाच घेणारा माणूस देशाचा नाश करतो.  ५  शेजाऱ्‍याची खोटी स्तुती करणारा,त्याच्या पायांसाठी जाळं पसरवतो.+  ६  वाईट माणूस आपल्या अपराधाच्या पाशात सापडतो,+पण नीतिमान आनंदाने जल्लोष करतो.+  ७  नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची* काळजी असते,+पण दुष्टाला त्यांची काहीच पर्वा नसते.+  ८  बढाईखोर लोक नगराला आग लावून देतात,+पण जे बुद्धिमान असतात, ते राग शांत करतात.+  ९  बुद्धिमान माणसाने मूर्खाशी वाद घातला,तर आरडाओरड आणि थट्टा होईल, पण तोडगा निघणार नाही.+ १०  हिंसक लोक निर्दोष* माणसाचा द्वेष करतात,+आणि सरळ मनाच्या माणसाचा जीव घेऊ पाहतात.* ११  मूर्ख माणूस आपल्या सगळ्या भावना व्यक्‍त करतो,+पण बुद्धिमान माणूस त्यांवर नियंत्रण ठेवून शांत राहतो.+ १२  जेव्हा एखादा शासक खोट्या गोष्टींकडे लक्ष देतो,तेव्हा त्याचे सर्व सेवक दुष्ट होतात.+ १३  गरीब माणूस आणि अत्याचार करणारा यांच्यात एक गोष्ट सारखी आहे:* दोघांच्याही डोळ्यांना यहोवाच प्रकाश देतो.* १४  राजा जेव्हा गरिबांचा योग्य न्याय करतो,+तेव्हा त्याचं राजासन कायम टिकून राहतं.+ १५  काठी* आणि ताडन यांमुळे बुद्धी मिळते,+पण मोकाट सोडलेला मुलगा, आपल्या आईला शरमेने खाली पाहायला लावतो. १६  दुष्ट वाढले की अपराधही वाढतात,पण नीतिमान त्यांचा नाश होताना पाहतील.+ १७  मुलाला शिस्त लाव म्हणजे तुझ्या जिवाला विश्रांती मिळेल;आणि त्याच्यामुळे तू खूप सुखी होशील.*+ १८  देवाकडून मार्गदर्शन* मिळत नाही, तेव्हा लोक अंदाधुंदपणे वागतात,+पण जे कायदा* पाळतात, ते सुखी असतात.+ १९  सेवक शब्दांनी सुधरत नाही,कारण त्याला कळतं, तरी तो आज्ञा पाळत नाही.+ २०  बोलण्याची घाई करणारा माणूस तू पाहिला आहेस का?+ त्याच्यापेक्षा मूर्खाला जास्त आशा आहे.+ २१  सेवकाला लहानपणापासून लाडवलंस,तर नंतर तो तुझे उपकार विसरून जाईल. २२  तापट माणूस वाद सुरू करतो;+जो लगेच रागावतो तो पुष्कळ अपराध करतो.+ २३  गर्विष्ठपणा माणसाला खाली पाडतो,+पण जो नम्र वृत्तीचा असतो, त्याचा गौरव होईल.+ २४  चोराचा साथीदार स्वतःचा* द्वेष करतो,तो साक्ष देण्याची घोषणा* ऐकूनही, काहीच सांगत नाही.+ २५  माणसांची भीती* पाश ठरते,+पण जो यहोवावर भरवसा ठेवतो, तो सुरक्षित राहील.+ २६  शासकाला भेटण्याची* इच्छा बऱ्‍याच लोकांना असते,पण माणसाला न्याय यहोवाकडूनच मिळतो.+ २७  नीतिमानाला दुष्ट माणसाची घृणा येते,+पण दुष्टाला सरळ मार्गाने चालणाऱ्‍याची घृणा वाटते.+

तळटीपा

किंवा “कायदेशीर हक्कांची.”
किंवा “निरपराध.”
किंवा कदाचित, “पण सरळ मनाचा माणूस आपल्या जिवाचं रक्षण करू पाहतो.”
शब्दशः “एकत्र भेटतात.”
म्हणजे, तो त्यांना जीवन देतो.
किंवा “शिस्त; शिक्षा.”
किंवा “तुझा जीव खूप सुखी होईल.”
शब्दशः “दृष्टान्त.” किंवा “भविष्याबद्दलचा दृष्टान्त; प्रकटीकरण.”
किंवा “देवाचं नियमशास्त्र.”
किंवा “स्वतःच्या जिवाचा.”
किंवा “शाप येण्याबद्दलची शपथ.”
किंवा “माणसांपुढे थरथर कापणं.”
किंवा कदाचित, “मर्जी मिळवण्याची.”