योहानला झालेलं प्रकटीकरण २१:१-२७

  • एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी (१-८)

    • यापुढे कोणीही मरणार नाही ()

    • सर्वकाही नवीन केलं जातं ()

  • नवीन यरुशलेमचं वर्णन (९-२७)

२१  मग, मला एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी दिसली.+ कारण आधीचं आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती,+ आणि समुद्रही+ राहिला नाही. २  मग मला पवित्र नगरी, नवीन यरुशलेमही दिसली. ती स्वर्गातून, देवापासून खाली उतरताना मला दिसली+ आणि ती आपल्या वरासाठी सजलेल्या वधूसारखी होती.+ ३  मग, राजासनातून एक मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “पाहा! देवाचा तंबू माणसांजवळ आहे, तो त्यांच्यासोबत राहील आणि ते त्याचे लोक होतील. आणि देव स्वतः त्यांच्यासोबत असेल.+ ४  तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.+ यापुढे कोणीही मरणार नाही,*+ कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.+ कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.” ५  आणि राजासनावर बसलेला+ देव म्हणाला: “पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.”+ पुढे तो असंही म्हणाला: “लिही, कारण ही वचनं विश्‍वसनीय* आणि खरी आहेत.” ६  मग तो मला म्हणाला: “ती वचनं पूर्ण झाली आहेत! मी अल्फा आणि ओमेगा,* म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे.+ जो कोणी तहानलेला असेल त्याला मी जीवनाच्या झऱ्‍याचं पाणी मोफत देईन.+ ७  जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्याचा देव होईन आणि तो माझा मुलगा होईल. ८  पण भितरे, विश्‍वास न ठेवणारे,+ अशुद्ध आणि घृणास्पद गोष्टी करणारे, खुनी,+ अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ भूतविद्या करणारे, मूर्तिपूजा करणारे आणि खोटं बोलणारे+ या सर्वांच्या वाट्याला अग्नी आणि गंधकाने जळणारं सरोवर येईल.+ हाच दुसरा मृत्यू आहे.”+ ९  मग, ज्यांच्याजवळ शेवटच्या सात पीडांनी+ भरलेल्या सात वाट्या होत्या, त्या सात स्वर्गदूतांपैकी एक आला आणि मला म्हणाला: “ये, मी तुला वधू दाखवतो, कोकऱ्‍याची वधू.”+ १०  तेव्हा, तो मला पवित्र शक्‍तीच्या* सामर्थ्याने एका मोठ्या, उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने मला यरुशलेम हे पवित्र नगर दाखवलं. ते स्वर्गातून, देवापासून उतरत होतं+ ११  आणि ते देवाच्या तेजाने प्रकाशित झालं होतं.+ त्याचं वैभव खूप मौल्यवान रत्नासारखं, स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्‍या यास्फे* रत्नासारखं होतं.+ १२  त्याच्याभोवती एक उंच आणि मोठी भिंत होती. त्याला १२ फाटकं असून त्या फाटकांजवळ १२ स्वर्गदूत होते. त्या फाटकांवर इस्राएलच्या मुलांच्या १२ वंशांची नावं कोरण्यात आली होती. १३  पूर्वेकडे तीन फाटकं, उत्तरेकडे तीन फाटकं, दक्षिणेकडे तीन फाटकं आणि पश्‍चिमेकडे तीन फाटकं होती.+ १४  नगराच्या भिंतीला १२ दगडांचा पायाही होता आणि त्यांवर कोकऱ्‍याच्या १२ प्रेषितांची १२ नावं+ लिहिलेली होती. १५  आता माझ्याशी जो बोलत होता त्याच्याकडे नगराचं, त्याच्या फाटकांचं आणि भिंतीचं मोजमाप घेण्यासाठी एक सोन्याचा वेत होता.+ १६  नगर चौकोनी आहे; त्याच्या रुंदीइतकीच त्याची लांबी आहे. त्याने त्या वेताने नगराचं माप घेतलं, तेव्हा ते सुमारे २,२२० किलोमीटर* इतकं होतं. त्याची लांबी, रुंदी आणि उंची सारखीच आहे. १७  नंतर, त्याने भिंतीचंही माप घेतलं आणि ते माणसाच्या, तसंच स्वर्गदूताच्या मापाप्रमाणे १४४ हात* इतकं होतं. १८  नगराची भिंत यास्फे रत्नापासून बनलेली होती+ आणि नगर पारदर्शक काचेसारख्या शुद्ध सोन्याचं होतं. १९  नगराच्या भिंतीचे पाये सर्व प्रकारच्या मौल्यवान रत्नांनी सजलेले होते: पहिला पाया यास्फे रत्नाचा होता; दुसरा नीलमणी, तिसरा मौल्यवान वाळूचा दगड, चौथा पाचू, २०  पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा चंद्रकांत, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा राहुरत्न आणि बारावा जमुनिया रत्नाचा होता. २१  तसंच, १२ फाटकं १२ मोत्यांची, म्हणजे प्रत्येक फाटक एकेका मोत्याचं होतं. आणि नगराचा मुख्य रस्ता पारदर्शक काचेसारखा, शुद्ध सोन्याचा होता. २२  त्या नगरात मला मंदिर दिसलं नाही, कारण सर्वसमर्थ देव यहोवा*+ आणि कोकरा हेच त्याचं मंदिर आहे. २३  त्या नगराला सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही. कारण देवाच्या तेजाने ते नगर प्रकाशित होतं+ आणि कोकरा त्याचा दीप आहे.+ २४  राष्ट्रं त्याच्या प्रकाशाने चालतील+ आणि पृथ्वीवरचे राजे आपलं ऐश्‍वर्य त्यात आणतील. २५  त्याची फाटकं दिवसा बंद होणारच नाहीत कारण तिथे कधीही रात्र होणार नाही.+ २६  आणि ते राष्ट्रांचं वैभव आणि प्रतिष्ठा त्यात आणतील.+ २७  पण, कोणतीही दूषित गोष्ट, तसंच कोणत्याही घृणास्पद गोष्टी आणि कपट करणारा कोणीही त्यात प्रवेश करणार नाही.+ तर, कोकऱ्‍याच्या जीवनाच्या गुंडाळीत ज्यांची नावं आहेत फक्‍त तेच त्यात प्रवेश करतील.+

तळटीपा

किंवा “यापुढे मरण राहणार नाही.”
किंवा “भरवशालायक.”
म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
काहींच्या मते हे हिऱ्‍याला सूचित करतं.
शब्दशः “१२,००० स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून १ स्टेडियम १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.
सुमारे ६४ मी. (२१० फूट). अति. ख१४ पाहा.
अति. क५ पाहा.