मत्तयने सांगितलेला संदेश १८:१-३५
१८ त्या वेळी, शिष्य येशूच्या जवळ येऊन म्हणाले: “स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा कोण?”+
२ तेव्हा येशूने एका लहान मुलाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला त्यांच्यामध्ये उभं करून
३ तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करून* लहान मुलांसारखं+ होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाताच येणार नाही.+
४ म्हणून, जो स्वतःला या लहान मुलासारखं नम्र करेल, तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा असेल.+
५ जो अशा एखाद्या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो.
६ पण, माझ्यावर विश्वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो, त्याच्या गळ्यात जात्याचा मोठा दगड* बांधून त्याला खोल समुद्रात टाकून दिलं, तर तेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.+
७ अडखळणांमुळे* या जगाची किती दुर्दशा होईल! अडखळणं तर नक्कीच येतील, पण ज्या माणसामुळे अडखळण येतं त्याची खूप वाईट स्थिती होईल!
८ म्हणून, जर तुझा हात किंवा पाय तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून फेकून दे.+ दोन हात किंवा दोन पायांसोबत सर्वकाळाच्या आगीत टाकलं जाण्यापेक्षा, अधू किंवा लंगडं होऊन जीवन मिळवणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+
९ तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो उपटून फेकून दे. कारण दोन डोळे असून गेहेन्नाच्या* आगीत टाकलं जावं, यापेक्षा एकच डोळा असून जीवन मिळवणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+
१० या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, की त्यांचे स्वर्गदूत नेहमी स्वर्गात माझ्या पित्यासमोर असतात.+
११ *——
१२ तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माणसाजवळ १०० मेंढरं असली आणि त्यांपैकी जर एक मेंढरू वाट चुकलं,+ तर तो ९९ मेंढरांना डोंगरावर तसंच सोडून, त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जाणार नाही का?+
१३ आणि जर त्याला ते सापडलं, तर मी तुम्हाला खातरीने सांगतो, की वाट न चुकलेल्या ९९ मेंढरांपेक्षा त्याला त्या एका मेंढराबद्दल जास्त आनंद होईल.
१४ त्याच प्रकारे, या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या* पित्याची इच्छा नाही.+
१५ तुझ्या भावाने एखादं पाप केलं, तर एकांतात जाऊन त्याच्याशी बोल आणि त्याचा दोष त्याला दाखव.*+ जर त्याने तुझं ऐकलं, तर तू आपल्या भावाला मिळवलं आहेस.+
१६ पण जर त्याने ऐकलं नाही, तर मग आपल्यासोबत आणखी एकदोन जणांना त्याच्याकडे घेऊन जा; म्हणजे दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने* प्रत्येक गोष्ट सिद्ध केली जाईल.+
१७ जर त्याने त्यांचं ऐकलं नाही, तर मंडळीशी बोल. आणि जर त्याने मंडळीचंही ऐकलं नाही, तर मग त्याला विदेश्यांसारखं+ किंवा जकातदारांसारखं समज.+
१८ मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी बांधाल, त्या स्वर्गात आधीच बांधलेल्या असतील आणि तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी मोकळ्या कराल, त्या स्वर्गात आधीच मोकळ्या केलेल्या असतील.
१९ तसंच, मी तुम्हाला खरं सांगतो, पृथ्वीवर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जर तुमच्यापैकी दोघांनी सहमत होऊन प्रार्थना केली, तर स्वर्गात राहणारा माझा पिता त्यांच्यासाठी त्या प्रार्थनेचं उत्तर देईल.+
२० कारण जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतात,+ तिथे मी त्यांच्यामध्ये असतो.”
२१ मग पेत्र येऊन त्याला म्हणाला: “प्रभू, माझा भाऊ माझ्याविरुद्ध पाप करत असेल, तर मी त्याला किती वेळा क्षमा करू? सात वेळा?”
२२ येशू त्याला म्हणाला: “मी तुला सांगतो, सात वेळा नाही, तर ७७ वेळा त्याला क्षमा कर.+
२३ स्वर्गाचं राज्य अशा एका राजासारखं आहे, ज्याने आपल्या दासांकडून हिशोब घ्यायचं ठरवलं.
२४ जेव्हा तो त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला, तेव्हा त्याच्यापुढे अशा एका माणसाला आणण्यात आलं ज्याच्यावर त्याचं सहा कोटी दिनारांचं* कर्ज होतं.
२५ पण हे कर्ज फेडायची त्याची ऐपत नसल्यामुळे, मालकाने त्याच्यासोबतच, त्याची बायको आणि मुलं, तसंच त्याच्या मालकीच्या सर्व वस्तू विकून ते कर्ज फेडावं असा हुकूम दिला.+
२६ तेव्हा तो दास मालकाच्या पाया पडून म्हणाला, ‘मला आणखी थोडा वेळ द्या, मी तुमचं सगळं कर्ज फेडीन.’
२७ तेव्हा मालकाला त्याची दया आली* आणि त्याने त्याचं कर्ज माफ करून त्याला जाऊ दिलं.+
२८ पण तो दास बाहेर गेल्यावर त्याला दुसरा एक दास भेटला. त्याच्यावर त्याचं १०० दिनारांचं* कर्ज होतं. तेव्हा पहिल्या दासाने त्याला धरलं आणि त्याचा गळा दाबून त्याला म्हटलं, ‘माझे पैसे आत्ताच्या आता परत कर.’
२९ दुसरा दास त्याच्या पाया पडून गयावया करू लागला आणि म्हणाला: ‘मला आणखी थोडा वेळ दे, मी तुझे सगळे पैसे परत करीन.’
३० पण तो काही ऐकायला तयार नव्हता, उलट त्याने त्या दुसऱ्या दासाला त्याचं पूर्ण कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकलं.
३१ इतर दासांनी हे सगळं पाहिलं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आपल्या मालकाकडे जाऊन घडलेली सगळी हकिगत त्याला सांगितली.
३२ तेव्हा त्याचा मालक त्याला बोलावून म्हणाला: ‘अरे दुष्ट दासा! तू माझ्यापुढे गयावया केलीस तेव्हा मी तुझं सगळं कर्ज माफ केलं.
३३ मग, जशी मी तुला दया दाखवली तशीच तूही तुझ्या सोबतच्या दासाला दया दाखवायला नको होती का?’+
३४ म्हणून मालक खूप संतापला आणि तो दास सगळं कर्ज फेडत नाही, तोपर्यंत त्याने त्याला तुरुंगातल्या शिपायांच्या हाती सोपवून दिलं.
३५ त्याच प्रकारे, जर तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही,+ तर स्वर्गातला माझा पिताही तुमच्याशी असाच व्यवहार करेल.”+
तळटीपा
^ किंवा “मागे फिरून.”
^ किंवा “गाढव ओढतं तसा जात्याचा दगड.”
^ किंवा “पाप करायला प्रवृत्त करणाऱ्या कारणांमुळे.” शब्दशः “अडखळायला लावणाऱ्या दगडांमुळे.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “तुमच्या.”
^ शब्दशः “आणि त्याची चूक सुधार.”
^ शब्दशः “तोंडून.”
^ किंवा “कळवळा आला.”