मत्तयने सांगितलेला संदेश २१:१-४६
२१ यरुशलेमजवळ आल्यावर ते जैतुनांच्या डोंगरावर असलेल्या बेथफगे इथे पोहोचले. तेव्हा येशूने दोन शिष्यांना असं सांगून पुढे पाठवलं:+
२ “समोरच्या गावात जा; तिथे गेल्यावर तुम्हाला एक गाढवी आणि तिचं पिल्लू बांधलेलं दिसेल. त्यांना सोडवून माझ्याकडे आणा.
३ जर कोणी काही म्हणालं, तर ‘प्रभूला यांची गरज आहे’ असं सांगा, म्हणजे तो लगेच त्यांना जाऊ देईल.”
४ संदेष्ट्याचं वचन पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं घडलं. त्याने असं म्हटलं होतं:
५ “सीयोनच्या मुलीला सांगा: ‘पाहा! तुझा राजा तुझ्याकडे येतोय.+ तो सौम्य+ आहे आणि तो गाढवावर, हो, ओझं वाहणाऱ्या गाढवीच्या पिल्लावर बसून येतोय.’”+
६ तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूने सांगितल्याप्रमाणे केलं.+
७ त्यांनी गाढवी आणि तिच्या पिल्लाला आणलं आणि आपली बाहेरची वस्त्रं त्यांच्यावर टाकली आणि येशू गाढवीच्या पिल्लावर बसला.+
८ जमलेल्या लोकांपैकी बहुतेकांनी आपली बाहेरची वस्त्रं रस्त्यावर पसरली.+ तर, इतरांनी झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर पसरल्या.
९ आणि त्याच्या पुढे आणि मागे चालणारे लोक अशी घोषणा करत होते: “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या मुलाचा उद्धार होवो!+ यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो!+ स्वर्गात राहणाऱ्या देवा, आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!”+
१० जेव्हा तो यरुशलेम शहरात आला तेव्हा संपूर्ण शहरात खळबळ माजली. सगळे लोक म्हणू लागले: “हा आहे तरी कोण?”
११ तेव्हा त्याच्यासोबतच्या लोकांनी त्यांना सांगितलं: “हा गालीलच्या नासरेथचा येशू संदेष्टा आहे!”+
१२ मग येशू मंदिरात गेला आणि जे लोक मंदिराच्या आत खरेदी-विक्री करत होते त्या सर्वांना त्याने तिथून हाकलून लावलं. तसंच, त्याने पैसे बदलून देणाऱ्यांचे मेज आणि कबुतरं विकणाऱ्यांची बाकं उलटून टाकली.+
१३ तो त्यांना म्हणाला: “‘माझ्या मंदिराला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलंय,+ पण तुम्ही तर याला लुटारूंची गुहा करत आहात.”+
१४ मग, मंदिरात आंधळे आणि लंगडे लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना बरं केलं.
१५ त्याने केलेली ही अद्भुत कार्यं जेव्हा मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी पाहिली आणि जेव्हा त्यांनी लहान मुलांना मंदिरात असं ओरडताना ऐकलं, की “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या मुलाचा उद्धार होवो!”+ तेव्हा त्यांना खूप राग आला.+
१६ आणि ते त्याला म्हणाले: “ही मुलं काय म्हणत आहेत हे तू ऐकलंस का?” येशू त्यांना म्हणाला: “हो. ‘तू लहान मुलांना आणि तान्ह्या बाळांना आपल्या तोंडाने स्तुती करायला लावलं आहेस,’ हे तुम्ही कधी वाचलं नाही का?”+
१७ मग त्यांना सोडून तो शहराबाहेर बेथानी इथे गेला आणि रात्री त्याने तिथेच मुक्काम केला.+
१८ पहाटे शहराकडे परत येताना त्याला भूक लागली.+
१९ मग, रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचं एक झाड दिसलं आणि तो त्याच्याजवळ गेला. पण झाडावर पानांशिवाय त्याला काहीही दिसलं नाही.+ तेव्हा तो त्या झाडाला म्हणाला: “तुला पुन्हा कधीही फळ येणार नाही.”+ आणि ते अंजिराचं झाड लगेच वाळून गेलं.
२० हे पाहून शिष्यांना फार आश्चर्य वाटलं आणि ते त्याला म्हणाले: “अंजिराचं झाड लगेच कसं काय वाळून गेलं?”+
२१ येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हाला खरं सांगतो, की जर तुमच्याजवळ विश्वास असला आणि तुम्ही शंका बाळगली नाही, तर जे मी अंजिराच्या झाडासोबत केलं, ते तर तुम्ही करालच; पण तुम्ही या डोंगराला जर म्हटलं, की ‘इथून उपटून समुद्रात जाऊन पड,’ तर तेसुद्धा घडेल.+
२२ आणि तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”+
२३ तो मंदिरात जाऊन शिकवत असताना मुख्य याजक आणि वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? कोणी दिला तुला हा अधिकार?”+
२४ येशू त्यांना म्हणाला: “मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला त्याचं उत्तर दिलं, तर मीही तुम्हाला सांगीन की मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो.
२५ योहानने दिलेला बाप्तिस्मा कोणापासून होता? देवापासून* की माणसांपासून?” तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’+
२६ आणि ‘माणसांपासून’ असं म्हटलं तर लोक आपल्याला सोडणार नाहीत. कारण ते सगळे योहानला संदेष्टा मानतात.”
२७ म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला नाही माहीत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हाला सांगणार नाही.
२८ तुम्हाला काय वाटतं ते सांगा. एका माणसाला दोन मुलं होती. तो पहिल्या मुलाजवळ जाऊन म्हणाला, ‘बाळा, आज तू द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’
२९ तेव्हा तो म्हणाला, ‘मी नाही जाणार,’ पण नंतर त्याला वाईट वाटलं आणि तो गेला.
३० दुसऱ्या मुलाजवळ जाऊन तो माणूस तसंच म्हणाला. तेव्हा त्याने उत्तर दिलं, ‘जातो बाबा,’ पण तो गेलाच नाही.
३१ तुमच्या मते या दोघांपैकी कोण आपल्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागला?” ते म्हणाले, “पहिला मुलगा.” येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जकातदार आणि वेश्या तुमच्याआधी देवाच्या राज्यात जातील.
३२ कारण योहानने तुमच्याकडे येऊन तुम्हाला योग्य मार्ग* दाखवला, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण, जकातदारांनी आणि वेश्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.+ हे पाहिल्यावरही तुम्हाला पस्तावा होऊन तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
३३ आणखी एक उदाहरण ऐका: एक जमीनदार होता. त्याने द्राक्षमळा लावला+ आणि त्याच्याभोवती कुंपण घातलं आणि त्यात द्राक्षं तुडवण्यासाठी द्राक्षकुंड खणलं आणि पहाऱ्यासाठी एक मचाण बांधलं.*+ मग माळ्यांना आपल्या द्राक्षमळ्याचा ठेका देऊन तो परदेशी गेला.+
३४ फळांचा हंगाम आला तेव्हा त्याने पिकातला स्वतःचा वाटा मागण्यासाठी आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवलं.
३५ पण माळ्यांनी त्याच्या दासांना धरून एकाला बेदम मारलं, दुसऱ्याला ठार मारलं आणि आणखी एकाला दगडमार केला.+
३६ मग त्याने पहिल्यापेक्षा जास्त दासांना पाठवलं. पण त्यांच्यासोबतही त्यांनी तसंच केलं.+
३७ शेवटी, त्याने स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे असा विचार करून पाठवलं, की ‘निदान ते माझ्या मुलाचा तरी मान राखतील.’
३८ पण मुलाला पाहून माळी आपसात म्हणू लागले, ‘हा तर वारस आहे.+ चला आपण त्याला मारून टाकू आणि त्याच्या वारशाची जमीन हडपून घेऊ!’
३९ म्हणून त्यांनी त्याला धरलं आणि द्राक्षमळ्याबाहेर नेऊन मारून टाकलं.+
४० मग, द्राक्षमळ्याचा मालक येईल तेव्हा तो या माळ्यांचं काय करेल?”
४१ ते त्याला म्हणाले: “ते दुष्ट असल्यामुळे तो त्यांना जिवंत सोडणार नाही. आणि तो द्राक्षमळ्याचा ठेका अशा माळ्यांना देईल, जे त्याला फळांच्या हंगामात त्याच्या वाट्याचं पीक देतील.”
४२ येशू त्यांना म्हणाला: “‘बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड नाकारला, तोच कोपऱ्याचा मुख्य दगड* बनलाय.+ हे यहोवाने* घडवून आणलंय आणि आमच्या दृष्टीत ते अद्भुत आहे,’ हे तुम्ही कधी शास्त्रात वाचलं नाही का?+
४३ म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो, की देवाचं राज्य तुमच्याकडून काढून घेतलं जाईल आणि त्याची फळं उत्पन्न करणाऱ्या राष्ट्राला ते दिलं जाईल.
४४ या दगडावर जो पडेल त्याचा चुराडा होईल.+ आणि ज्या कोणावर तो पडेल त्याला तो चिरडून टाकेल.”+
४५ मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी त्याची ही उदाहरणं ऐकली, तेव्हा तो आपल्याबद्दलच बोलत आहे हे त्यांच्या लक्षात आलं.+
४६ त्याला धरण्याची* त्यांची इच्छा होती, पण ते लोकांना घाबरत होते, कारण लोक त्याला संदेष्टा मानायचे.+
तळटीपा
^ शब्दशः “स्वर्गापासून.”
^ शब्दशः “नीतिमत्त्वाचा मार्ग.”
^ किंवा “माळा बांधला.”
^ शब्दार्थसूचीत “कोपऱ्याचा दगड” पाहा.
^ किंवा “अटक करण्याची.”