यशया ४३:१-२८
४३ हे याकोब! तुला निर्माण करणारा यहोवा,हे इस्राएल! तुला घडवणारा देव असं म्हणतो,+“घाबरू नकोस, कारण मी किंमत देऊन तुझी सुटका केली आहे.+
मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे,तू माझा आहेस.
२ तू जलाशय ओलांडशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन,+तू नद्यांमधून जाशील तरी तू बुडणार नाहीस,+तू आगीतून चालशील तरी तुला भाजणार नाही,आगीच्या ज्वालांची तुला झळ बसणार नाही.
३ कारण मी, यहोवा तुझा देव आहे.
मी इस्राएलचा पवित्र देव, तुझा तारणकर्ता आहे.
मी इजिप्त, इथियोपिया आणि सबा यांना तुझ्यासाठी खंडणी म्हणून दिलंय.
४ तू माझ्या नजरेत मौल्यवान आहेस,+मला तुझा आदर आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे.+
म्हणून मी तुझ्या जागी लोकांना देईन,तुझ्या जिवाच्या बदल्यात मी राष्ट्रांना देईन.
५ घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे.+
मी तुझ्या संततीला* पूर्वेकडून आणीन,आणि पश्चिमेकडून तुला गोळा करीन.+
६ मी उत्तरेला म्हणीन, ‘त्यांना जाऊ दे!’+
आणि दक्षिणेला सांगीन, ‘त्यांना धरून ठेवू नकोस.
माझ्या मुलांना दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या टोकांपासून घेऊन ये.+
७ ते सगळे माझ्या नावाने ओळखले जातात,+मी त्यांना माझ्या गौरवासाठी बनवलंय,मी त्यांना घडवलंय आणि निर्माण केलंय.’+
८ डोळे असूनही जे आंधळे आहेत,आणि कान असूनही जे बहिरे आहेत त्यांना घेऊन या.+
९ सर्व राष्ट्रांनी एका ठिकाणी जमावं,आणि सगळ्या लोकांनी एकत्र यावं.+
त्यांच्यातला* कोण या गोष्टी सांगेल?
किंवा त्यांच्यातला कोण पहिल्या घडणाऱ्या गोष्टी* आपल्याला कळवेल?+
आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्यासाठी,त्यांनी आपले साक्षीदार पुढे आणावेत,म्हणजे ते ऐकून म्हणतील, ‘हे खरंय!’”+
१० यहोवा म्हणतो, “तुम्ही माझे साक्षीदार आहात,+हो, तू माझा सेवक आहेस.
तुम्ही मला ओळखावं आणि माझ्यावर विश्वास* ठेवावा,आणि मी तोच आहे हे समजावं,+म्हणून मी तुम्हाला निवडलंय.+
माझ्या आधी कोणी देव नव्हता,आणि माझ्यानंतरही कोणी होणार नाही.+
११ मीच यहोवा आहे,+ आणि माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही.”+
१२ यहोवा म्हणतो, “तुमच्यामध्ये कोणताही परका देव नव्हता,+त्या वेळी पुढे घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणारा, त्या जाहीर करणारा आणि तुम्हाला वाचवणारा मीच होतो.
म्हणून तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि मीच देव आहे.”+
१३ शिवाय, मी नेहमी जसा होतो तसाच आहे;+कोणीही माझ्या हातून काही हिसकावून घेऊ शकत नाही.+
मी एखादं काम करतो, तेव्हा कोण मला अडवू शकतं?+
१४ तुमची सुटका करणारा,+ इस्राएलचा पवित्र देव+ यहोवा असं म्हणतो:
“मी तुमच्यासाठी बाबेलला सैन्य पाठवीन आणि दरवाजांचे सगळे अडसर तोडून टाकीन,+आणि खास्दी लोक आपल्या जहाजांमध्ये दुःखाने ओरडतील.+
१५ मी तुमचा पवित्र देव यहोवा आहे.+ मी इस्राएलचा निर्माणकर्ता,+ तुमचा राजा आहे.”+
१६ यहोवा हा समुद्रातून मार्ग काढणारा,खवळलेल्या पाण्यातून वाट काढणारा देव आहे;+
१७ तोच युद्धाचे रथ आणि घोडे,शूर योद्धे आणि सैन्य बाहेर आणतो.+
तो म्हणतो: “ते खाली पडतील आणि परत कधीच उठणार नाहीत,+जळती वात जशी विझवली जाते, तसं त्यांना कायमचं विझवलं जाईल.”
१८ “पूर्वीच्या गोष्टी आठवू नका,आणि घडून गेलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नका.
१९ पाहा! मी काहीतरी नवीन करतोय.+
त्याची सुरुवातही झाली आहे.
तुम्हाला ते दिसत नाही का?
मी ओसाड रानातून मार्ग काढीन,+आणि वाळवंटातून नद्या वाहायला लावीन.+
२० रानातले जंगली प्राणी माझा आदर करतील,कोल्हे आणि शहामृग माझा सन्मान करतील.
कारण माझ्या लोकांना, माझ्या निवडलेल्या लोकांना,+मी ओसाड रानात पिण्यासाठी पाणी पुरवीन,+आणि वाळवंटात नद्या वाहायला लावीन.
२१ या लोकांनी माझी स्तुती करावी म्हणून,मी स्वतःसाठी त्यांना घडवलंय.+
२२ पण हे याकोब, तू मला हाक मारली नाहीस,+कारण हे इस्राएल, तुला माझा कंटाळा आला.+
२३ तू मला होमार्पणं द्यायला मेंढरं आणली नाहीस,किंवा आपल्या बलिदानांनी माझा गौरव केला नाहीस.
मी तुला भेट आणायची बळजबरी केली नव्हती,किंवा तुला कंटाळा येईपर्यंत मी तुझ्याकडे धूपाची मागणी केली नव्हती.+
२४ तू आपल्या पैशांनी माझ्यासाठी अगरू* विकत घेतला नाहीस,किंवा आपल्या बलिदानांच्या चरबीने मला तृप्त केलं नाहीस.+
उलट, तू तुझ्या पापांचं ओझं माझ्यावर लादलंस,आणि तुझ्या अपराधांनी मला थकवलंस.+
२५ स्वतःच्या नावासाठी+ तुझे अपराध* मिटवून टाकणारा, तो मीच आहे.+
मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.+
२६ मला आठवण करून दे; आपण एकमेकांसमोर आपला खटला सादर करू,तू आपली बाजू मांड आणि निर्दोष आहेस हे सिद्ध कर.
२७ तुझ्या पहिल्या पूर्वजाने पाप केलं,आणि तुझ्या वतीने बोलणाऱ्यांनी* माझ्याविरुद्ध बंड केलं.+
२८ म्हणून मी पवित्र ठिकाणाच्या अधिकाऱ्यांना अशुद्ध करीन,मी याकोबचा नाश,आणि इस्राएलची निंदा होऊ देईन.+
तळटीपा
^ शब्दशः “बीज.”
^ हे भविष्यात घडणाऱ्या सगळ्यात पहिल्या गोष्टींना सूचित करत असावं.
^ हे खोट्या दैवतांना सूचित करतं असं दिसतं.
^ किंवा “भरवसा.”
^ एक सुगंधी वनस्पती.
^ किंवा “तुझी बंडखोर कामं.”
^ हे कदाचित नियमशास्त्र शिकवणाऱ्यांना सूचित करतं.