यशया ५१:१-२३
५१ नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनो,यहोवाला शोधणाऱ्यांनो, माझं ऐका.
ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढलंय, त्याकडे पाहा.
ज्या खाणीतून तुम्हाला खणण्यात आलंय, तिच्याकडे लक्ष द्या.
२ तुमचा पिता अब्राहाम याच्याकडे,आणि जिने तुम्हाला जन्म दिला, त्या साराकडे+ पाहा.
मी त्याला बोलावलं तेव्हा तो एकटाच होता,+पण मी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याची संतती अगणित केली.+
३ यहोवा सीयोनचं सांत्वन करेल.+
तो तिच्या सगळ्या उद्ध्वस्त ठिकाणांचं सांत्वन करेल,+तो तिचं ओसाड रान एदेनसारखं,+आणि तिचा वाळवंटी प्रदेश यहोवाच्या बागेसारखा करेल.+
तिच्यामध्ये आनंदोत्सव आणि जल्लोष होईल.
उपकारस्तुतीचा आणि मधुर गीतांचा आवाज तिच्यामध्ये ऐकू येईल.+
४ माझ्या लोकांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
हे माझ्या राष्ट्रा,+ माझ्या बोलण्याकडे कान दे.
कारण माझ्यामधून नियम निघेल.+
आणि राष्ट्रांतल्या लोकांना प्रकाश मिळावा,म्हणून मी माझ्या न्यायाची स्थापना करीन.+
५ माझं नीतिमत्त्व जवळ येत आहे.+
माझ्याकडून मिळणारं तारण मार्गातच आहे,+माझ्या हातांच्या शक्तीने मी राष्ट्रांचा न्याय करीन.+
द्वीपं माझी आशा धरतील,+ते माझ्या हाताचं सामर्थ्य बघण्याची वाट पाहतील.
६ वर आकाशाकडे आपले डोळे लावा,आणि खाली पृथ्वीकडेही लक्ष द्या.
आकाश धुरासारखं नाहीसं होईल;पृथ्वी कापडासारखी जीर्ण होऊन जाईल,आणि तिच्यावरचे लोक चिलटांसारखे मरून जातील.
पण माझ्याकडून मिळणारं तारण सर्वकाळ टिकेल,+आणि माझ्या नीतिमत्त्वाचा कधीच अंत होणार नाही.+
७ नीतिमत्त्वाची ओळख असणाऱ्यांनो, माझं ऐका.
माझा नियम* आपल्या हृदयात बाळगणाऱ्या लोकांनो,+ माझ्याकडे लक्ष द्या.
नश्वर माणसांच्या टोमण्यांना घाबरू नका,आणि ते करत असलेल्या अपमानांना भिऊ नका.
८ कारण कसर त्यांना कापडासारखं खाऊन टाकेल,आणि कीड* त्यांना लोकरीसारखं फस्त करेल.+
पण माझं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल,आणि माझ्याकडून मिळणारं तारण पिढ्या न् पिढ्या टिकून राहील.”+
९ हे यहोवाच्या हाता, जागा हो!
तुझी ताकद दाखव.+
तू प्राचीन काळी, पूर्वीच्या पिढ्यांच्या काळी जसा जागा झाला होतास, तसा जागा हो.
तूच राहाबचे*+ तुकडे-तुकडे केले नव्हते का?
आणि समुद्रातल्या महाकाय प्राण्यालाही तूच भोसकलं नव्हतं का?+
१० विशाल समुद्रातलं पाणी आटवणारा, खोल सागराला कोरडा करणारा तूच नव्हतास का?+
सोडवलेल्या लोकांना पार जाता यावं, म्हणून तूच समुद्राच्या खोल तळाचा रस्ता केला नव्हतास का?+
११ यहोवाने मुक्त केलेले लोक परत येतील.+
ते आनंदाने जयजयकार करत सीयोनकडे येतील,+त्यांच्या डोक्यावर सर्वकाळ टिकणाऱ्या आनंदाचा मुकुट असेल.+
ते हर्षाने आणि आनंदाने भरून जातील,दुःख आणि शोक त्यांच्यापासून पळ काढतील.+
१२ “तुझं सांत्वन करणारा मीच आहे.+
मग तू अशा नश्वर माणसांना का घाबरतेस, जे एक ना एक दिवस मरून जातील?+
गवतासारखं सुकून जाणाऱ्या माणसांना तू का भितेस?
१३ तुझ्या निर्माणकर्त्याला, यहोवाला तू का विसरतेस?+
ज्याने आकाश पसरवलं+ आणि पृथ्वीचा पाया घातला त्याला का विसरतेस?
जुलूम करणाऱ्याच्या क्रोधामुळे तू दिवसभर घाबरलेली असायचीस,जसं काय त्याच्याकडे तुझा नाश करायची शक्ती होती.
जुलूम करणाऱ्याचा तो राग आता कुठे गेला?
१४ जो साखळदंडांमुळे वाकून गेलाय, त्याला लवकरच सोडून दिलं जाईल;+तो मरणार नाही किंवा कबरेत जाणार नाही,त्याची उपासमार होणार नाही.
१५ पण मी यहोवा तुझा देव आहे.
मी समुद्राची उलथापालथ करतो आणि त्याच्या लाटांना उसळायला लावतो,+माझं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे.+
१६ आकाशाची स्थापना करण्यासाठी व पृथ्वीचा पाया घालण्यासाठी,+आणि ‘तुम्ही माझे लोक आहात’ असं सीयोनला म्हणण्यासाठी,+मी माझे शब्द तुझ्या मुखात घालीन,आणि माझ्या हाताच्या सावलीने मी तुला झाकीन.+
१७ हे यरुशलेम, ऊठ! जागी हो!+
तू यहोवाच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला प्यायलीस.
द्राक्षारसाचा प्याला तू पिऊन टाकलास;झोकांड्या खाईपर्यंत तू प्यायलीस, एक थेंबही तू सोडला नाहीस.+
१८ तू जन्म दिलेल्या मुलांपैकी एकही जण तुला रस्ता दाखवायला नाही.
तू वाढवलेल्या मुलांपैकी एकानेही तुझा हात धरला नाही.
१९ तुझ्यावर दोन संकटं कोसळतील.
तुझा नाश होईल आणि तू उजाड होशील,तुझी उपासमार होईल आणि तुझ्यावर तलवार पडेल.+
तेव्हा कोणाला तुझी दया येईल?
कोण तुझं सांत्वन करेल?+
२० तुझी मुलं बेशुद्ध पडलीत.+
रानमेंढी जशी जाळ्यात अडकून पडून राहते,तसं ते चौकाचौकांत पडून आहेत.
यहोवाच्या क्रोधाचा, तुझ्या देवाच्या धमकीचा त्यांना जबरदस्त तडाखा बसलाय.”
२१ म्हणून, हे दुःखी असलेली स्त्री, ऐक!
तू नशेत आहेस; पण द्राक्षारसाच्या नशेत नाही; मी काय म्हणतो ते ऐक!
२२ तुझा प्रभू यहोवा, जो आपल्या लोकांचं संरक्षण करतो तो देव असं म्हणतो:
“बघ! जो प्याला पिऊन तू झोकांड्या खात आहेस, तो मी तुझ्या हातून काढून घेईन;+माझ्या क्रोधाचा प्याला मी तुझ्याकडून काढून घेईन,तो तू परत कधीच पिणार नाहीस.+
२३ तो प्याला मी तुझा छळ करणाऱ्यांच्या हातात देईन,+जे तुला म्हणाले: ‘पालथी पड, म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ!’
ज्यांच्यासाठी तू तुझी पाठ जमिनीसारखी केलीस;ज्यांना चालण्यासाठी तू ती रस्त्यासारखी केलीस, त्यांच्या हातात मी तो प्याला देईन.”