यशया ६:१-१३

  • यहोवा मंदिरात असल्याचा दृष्टान्त (१-४)

    • “यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!” ()

  • यशयाचा दोष दूर केला जातो (५-७)

  • यशयाला मिळालेली जबाबदारी (८-१०)

    • “मी जाईन! मला पाठव!” ()

  • “हे यहोवा! असं किती दिवस चालेल?” (११-१३)

 उज्जीया राजाचा मृत्यू झाला,+ त्या वर्षी मी यहोवाला उंच स्थानावर असलेल्या एका भव्य राजासनावर बसलेलं पाहिलं.+ त्याच्या झग्याच्या घेराने संपूर्ण मंदिर भरून गेलं होतं. २  त्याच्या सभोवती सराफदूत उभे होते. त्या प्रत्येकाला सहा पंख होते. दोन पंखांनी ते आपला चेहरा झाकायचे, दोन पंखांनी आपले पाय झाकायचे आणि दोन पंखांनी ते उडायचे.  ३  ते मोठ्या आवाजात एकमेकांना असं म्हणत होते: “सैन्यांचा देव यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!+ त्याच्या वैभवाने संपूर्ण पृथ्वी भरून गेली आहे.” ४  त्या मोठ्या आवाजाने दरवाजाच्या चौकटी हादरल्या आणि मंदिर धुराने भरून गेलं.+  ५  तेव्हा मी म्हणालो: “आता माझं काही खरं नाही! मी नक्कीच मरणार! कारण मी माझ्या डोळ्यांनी राजाला, प्रत्यक्ष सैन्यांचा देव यहोवा याला पाहिलंय! मी तर अशुद्ध ओठांचा माणूस आहे,+आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो.”  ६  तेव्हा एक सराफदूत उडत माझ्याकडे आला. त्याच्या हातात एक जळता निखारा होता;+ त्याने तो निखारा चिमट्याने वेदीवरून घेतला होता.+   ७  निखारा माझ्या ओठांना लावून तो मला म्हणाला: “हे बघ! तुझ्या ओठांना याचा स्पर्श झालाय. आता तुझा दोष दूर झालाय,आणि तुझं पाप क्षमा करण्यात आलंय.”* ८  मग मी यहोवाला असं बोलताना ऐकलं: “मी कोणाला पाठवू? आपल्यासाठी कोण जाईल?”+ तेव्हा मी म्हणालो: “मी जाईन! मला पाठव!”+  ९  त्यावर तो म्हणाला, “जा, आणि या लोकांना सांग: ‘तुम्ही वारंवार ऐकाल,पण तुम्हाला कळणार नाही;तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल,पण तुम्हाला समजणार नाही.’+ १०  या लोकांचं मन कठोर कर,+म्हणजे ते समजू शकणार नाहीत;त्यांचे कान बधिर कर,+म्हणजे ते ऐकू शकणार नाहीत;त्यांचे डोळे बंद कर,म्हणजे ते पाहू शकणार नाहीत;आणि ते माझ्याकडे परत येणार नाहीत व मी त्यांना बरं करणार नाही.”+ ११  तेव्हा मी म्हणालो: “हे यहोवा! असं किती दिवस चालेल?” त्यावर तो मला म्हणाला: “जोपर्यंत शहरांचा नाश होऊन त्यांत एकही माणूस उरत नाही,घरं रिकामी पडत नाहीत,आणि देश उद्ध्‌वस्त होऊन ओसाड पडत नाही तोपर्यंत;+ १२  तसंच जोपर्यंत मी, यहोवा, लोकांना दूर घालवून देत नाही,+आणि ओसाड पडलेल्या देशाची अवस्था आणखी बिकट होत नाही तोपर्यंत. १३  पण त्यात दहावा भाग उरेल आणि तो पुन्हा जाळला जाईल; जसा एखादा मोठा वृक्ष किंवा अल्लोन* वृक्ष कापल्यावर त्याचा बुंधा उरतो, तशी एक पवित्र संतती* देशाचा बुंधा म्हणून उरेल.”

तळटीपा

किंवा “तुझ्या पापाचं प्रायश्‍चित्त झालंय.”
एक प्रकारचा मोठा वृक्ष. इंग्रजीत याला “ओक”  म्हणतात.
किंवा “बीज.”