योहानने सांगितलेला संदेश २०:१-३१
२० आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे, अंधार असतानाच मग्दालीया मरीया कबरेकडे* आली.+ पण कबरेच्या* तोंडावर लावलेला दगड आधीच बाजूला केलेला तिला दिसला.+
२ म्हणून ती धावत शिमोन पेत्रकडे आणि ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं+ त्या शिष्याकडे आली आणि त्यांना म्हणाली: “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेलंय.+ त्याला कुठे ठेवलंय हे आम्हाला माहीत नाही.”
३ तेव्हा पेत्र आणि तो दुसरा शिष्य कबरेकडे जायला निघाले.
४ ते दोघं सोबतच धावत निघाले, पण दुसरा शिष्य त्याच्यापुढे जाऊन त्याच्याआधी कबरेजवळ पोहोचला.
५ त्याने कबरेच्या आत डोकावून पाहिलं तेव्हा तिथे मलमलीची कापडं पडलेली त्याला दिसली.+ पण तो आत गेला नाही.
६ मग त्याच्यामागून शिमोन पेत्र आला आणि कबरेच्या आत गेला. आणि त्याला तिथे मलमलीची कापडं पडलेली दिसली.
७ पण ज्या कापडाने येशूचं डोकं झाकलं होतं ते इतर कापडांच्या पट्ट्यांसोबत नसून, एकीकडे गुंडाळून ठेवलेलं होतं.
८ मग जो शिष्य सगळ्यात आधी कबरेजवळ पोहोचला होता, तोसुद्धा कबरेच्या आत गेला आणि त्याने पाहिलं आणि विश्वास ठेवला.
९ येशूचं मरणातून उठणं आवश्यक आहे, हे शास्त्रवचन त्यांना अजूनही समजलं नव्हतं.+
१० त्यामुळे शिष्य आपापल्या घरी परत गेले.
११ पण मरीया अजूनही कबरेच्या बाहेर रडत उभी होती. रडतारडता तिने कबरेच्या आत डोकावून पाहिलं,
१२ तेव्हा जिथे येशूचा मृतदेह ठेवण्यात आला होता, तिथे तिला शुभ्र वस्त्रं घातलेले दोन स्वर्गदूत दिसले;+ एक उशाशी आणि दुसरा पायाशी बसला होता.
१३ ते तिला म्हणाले: “बाई, का रडतेस?” तेव्हा ती त्यांना म्हणाली: “ते माझ्या प्रभूला घेऊन गेले. त्यांनी त्याला कुठे ठेवलंय हे मला माहीत नाही.”
१४ असं म्हटल्यावर तिने मागे वळून पाहिलं तेव्हा येशू तिथे उभा होता. पण तो येशू आहे हे तिला समजलं नाही.+
१५ येशू तिला म्हणाला: “बाई, का रडतेस? तू कोणाला शोधत आहेस?” तो माळी आहे असं समजून ती त्याला म्हणाली: “तुम्ही त्याला इथून नेलं असेल, तर त्याला कुठे ठेवलंय ते मला सांगा, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”
१६ येशू तिला म्हणाला: “मरीया!” तेव्हा मागे वळून ती इब्री भाषेत त्याला म्हणाली: “रब्बोनी!” (म्हणजे, “गुरुजी!”)
१७ मग येशू तिला म्हणाला: “मला बिलगून राहू नकोस, कारण मी अजून वर पित्याकडे गेलेलो नाही. तर माझ्या भावांना जाऊन सांग,+ की ‘मी माझ्या पित्याकडे+ आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या देवाकडे आणि तुमच्या देवाकडे वर जातोय.’”+
१८ मग मग्दालीया मरीयाने शिष्यांना येऊन ही बातमी सांगितली: “मी प्रभूला पाहिलंय!” आणि तो तिला जे काही म्हणाला होता, ते तिने त्यांना सांगितलं.+
१९ त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य यहुद्यांच्या भीतीमुळे दार लावून घरात बसले होते. तेव्हा येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला: “तुम्हाला शांती असो.”+
२० असं म्हणून त्याने त्यांना आपले हात आणि आपली कूस दाखवली.+ तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना खूप आनंद झाला.+
२१ येशू पुन्हा त्यांना म्हणाला: “तुम्हाला शांती असो.+ जसं पित्याने मला पाठवलंय,+ तसं मीही तुम्हाला पाठवतोय.”+
२२ असं म्हटल्यानंतर, तो त्यांच्यावर फुंकर मारून म्हणाला: “तुम्हाला पवित्र शक्ती* मिळो.+
२३ तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्यांची क्षमा होईल. पण, जर तुम्ही क्षमा केली नाही, तर त्यांची क्षमा होणार नाही.”
२४ पण येशू आला तेव्हा १२ शिष्यांपैकी, ज्याला ‘जुळा’ असंही म्हटलं जायचं तो थोमा+ इतर शिष्यांसोबत तिथे नव्हता.
२५ म्हणून ते त्याला सांगू लागले: “आम्ही प्रभूला पाहिलंय!” पण तो त्यांना म्हणाला: “जोपर्यंत मी त्याच्या हातांवर खिळ्यांच्या खुणा पाहणार नाही आणि त्यात बोट घालणार नाही आणि त्याच्या कुशीत हात घालणार नाही,+ तोपर्यंत माझा विश्वासच बसणार नाही.”
२६ मग आठ दिवसांनंतर, शिष्य पुन्हा एकदा घरात असताना थोमाही त्यांच्यासोबत होता. तेव्हा दार बंद असूनही येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि म्हणाला: “तुम्हाला शांती असो.”+
२७ मग तो थोमाला म्हणाला: “माझ्या हातांना बोट लावून पाहा आणि आपला हात माझ्या कुशीत घाल. शंका घ्यायचं* सोडून दे आणि विश्वास ठेव.”
२८ तेव्हा थोमा त्याला म्हणाला: “माझ्या प्रभू, माझ्या देवा!”
२९ येशू त्याला म्हणाला: “तू मला पाहिलंस, म्हणून विश्वास ठेवतोस का? जे न पाहताही विश्वास ठेवतात, ते सुखी.”
३० खरंतर, येशूने आपल्या शिष्यांसमोर असे इतर बरेच चमत्कार* केले. ते सगळे या गुंडाळीत लिहिलेले नाहीत.+
३१ पण जे लिहिलेले आहेत ते या उद्देशाने, की येशू हा ख्रिस्त आणि देवाचा मुलगा आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि या विश्वासामुळे तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळावं.+
तळटीपा
^ किंवा “स्मारक कबरेकडे.”
^ किंवा “स्मारक कबरेच्या.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “अविश्वास दाखवायचं.”
^ शब्दशः “चिन्हं.”