लेवीय १:१-१७
-
होमार्पण (१-१७)
१ मग यहोवाने* मोशेला बोलावलं आणि तो भेटमंडपातून त्याच्याशी बोलला+ आणि म्हणाला:
२ “इस्राएली लोकांशी* बोल आणि त्यांना सांग, की ‘तुमच्यापैकी कोणी आपल्या जनावरांतून यहोवासाठी एखादं अर्पण आणलं, तर तुम्ही ते गुराढोरांच्या कळपातून किंवा बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या कळपातून आणावं.+
३ जर त्याचं अर्पण हे गुराढोरांच्या कळपातलं होमार्पण असेल, तर त्याने कोणताही दोष नसलेला नर आणावा.+ त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ स्वेच्छेने+ तो यहोवासमोर आणावा.
४ त्याने होमार्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर हात ठेवावा, म्हणजे तो त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून स्वीकारला जाईल.
५ त्यानंतर तो गोऱ्हा* यहोवासमोर कापावा. मग याजक,+ म्हणजे अहरोनची मुलं त्याचं रक्त आणून, भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ असलेल्या वेदीच्या सभोवती ते शिंपडतील.+
६ होमार्पण म्हणून आणलेल्या प्राण्याची कातडी काढून त्याचे तुकडे करावेत.+
७ याजकांनी, म्हणजे अहरोनच्या मुलांनी वेदीवर आग पेटवावी+ आणि आगीवर लाकडं रचून ठेवावीत.
८ मग अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या शरीराचे तुकडे, तसंच, त्याचं डोकं आणि त्याच्या गुरद्यांवरची चरबी याजकांनी, म्हणजे अहरोनच्या मुलांनी वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवर ठेवावी.+
९ त्याची आतडी आणि पाय पाण्याने धुवावेत आणि याजकाने हे सर्व वेदीवर होमार्पण म्हणून जाळावं.* हे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+
१० जर त्याचं अर्पण हे बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या कळपातलं+ होमार्पण असेल, तर त्याने कोणताही दोष नसलेला नर आणावा.+
११ त्या प्राण्याला वेदीच्या उत्तरेकडे यहोवासमोर कापावं आणि याजकांनी, म्हणजे अहरोनच्या मुलांनी त्याचं रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावं.+
१२ मग प्राण्याच्या शरीराचे तुकडे करावेत, आणि याजकाने हे तुकडे, तसंच त्याचं डोकं आणि त्याच्या गुरद्यांवरची चरबी वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवर ठेवावी.
१३ त्याची आतडी आणि पाय पाण्याने धुवावेत आणि याजकाने हे सर्व आणून वेदीवर जाळावं. हे एक होमार्पण, म्हणजे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*
१४ पण जर त्याला यहोवासाठी पक्ष्यांचं होमार्पण करायचं असेल, तर त्याने पारवे किंवा कबुतराची पिल्लं अर्पण म्हणून आणावीत.+
१५ याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणून त्याची मान तोडावी आणि त्याला वेदीवर जाळावं. पण, त्याचं रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावं.
१६ त्याने त्याच्या गळ्यातली पिशवी आणि त्याची पिसं काढून, ती पूर्वेकडे, वेदीच्या बाजूला राख* टाकतात तिथे फेकून द्यावी.+
१७ त्याने त्याला पंखांच्या मधोमध कापावं, पण त्याचे दोन भाग करू नयेत. मग याजकाने त्याला वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवर जाळावं. हे एक होमार्पण, म्हणजे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “इस्राएलच्या मुलांशी.”
^ किंवा “तरणा बैल.”
^ शब्दशः “जाळून धूर करावा.”
^ किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
^ किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
^ किंवा “चरबीयुक्त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.
^ किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”