लेवीय २२:१-३३
२२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला:
२ “अहरोनला आणि त्याच्या मुलांना सांग, की इस्राएली लोकांनी दिलेली पवित्र अर्पणं हाताळताना त्यांनी काळजी घ्यावी.* तसंच, ज्या गोष्टी ते माझ्यासाठी पवित्र करत आहेत त्यांचा गैरवापर करून त्यांनी माझ्या पवित्र नावाचा अनादर करू नये.+ मी यहोवा आहे.
३ त्यांना सांग, ‘तुमच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांमध्ये, तुमच्या संततीपैकी जो कोणी अशुद्ध असताना, इस्राएली लोकांनी यहोवासाठी दिलेल्या पवित्र अर्पणांच्या जवळ येईल त्याला* ठार मारलं जाईल.+ मी यहोवा आहे.
४ अहरोनच्या संततीपैकी ज्याला कुष्ठरोग झाला आहे+ किंवा ज्याच्या गुप्तांगातून स्राव होत आहे,+ किंवा मेलेल्या माणसामुळे* अशुद्ध झालेल्या व्यक्तीला ज्याने स्पर्श केला आहे,+ किंवा ज्याचा वीर्यपात झाला आहे,+ अशा कोणत्याही माणसाने शुद्ध झाल्याशिवाय पवित्र अर्पणांतून काहीही खाऊ नये;+
५ तसंच, जो कोणी घोळक्यत राहणाऱ्या एखाद्या अशुद्ध जीवजंतूला स्पर्श करतो+ किंवा कोणत्याही कारणामुळे अशुद्ध झालेल्या आणि दुसऱ्यालाही अशुद्ध करू शकणाऱ्या माणसाला स्पर्श करतो,+ त्यानेही पवित्र अर्पणांतून काही खाऊ नये.
६ यांपैकी कोणालाही स्पर्श करणारा माणूस* संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि त्याने पवित्र अर्पणांमधलं काहीही खाऊ नये. त्याने अंघोळ करून स्वतःला शुद्ध करावं.+
७ सूर्य मावळल्यावर तो शुद्ध होईल आणि त्यानंतर तो पवित्र अर्पणांतून खाऊ शकतो कारण ते त्याचं अन्न आहे.+
८ तसंच, त्याने मेलेल्या स्थितीत सापडलेल्या प्राण्याचं किंवा जंगली पशूंनी फाडलेल्या प्राण्याचं मांस खाऊन स्वतःला अशुद्ध करू नये.+ मी यहोवा आहे.
९ त्यांनी माझ्याबद्दलचं त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे, नाहीतर या पापाबद्दल ते दोषी ठरतील आणि त्यांना यासाठी मरावं लागेल, कारण त्यांनी माझ्या पवित्र अर्पणांचा अनादर केला आहे. त्यांना पवित्र करणारा मी यहोवा आहे.
१० ज्याला अधिकार नाही अशा कोणत्याही माणसाने* पवित्र अर्पणांतून काहीही खाऊ नये.+ याजकाच्या विदेशी पाहुण्याने किंवा एखाद्या मजुराने पवित्र अर्पणांतून काही खाऊ नये.
११ पण जर याजकाने एखाद्याला* स्वतःच्या पैशांनी विकत घेतलं असेल, तर तो त्यांतून खाऊ शकतो. याजकाच्या घरात जन्मलेले दासही त्याच्या अन्नातून खाऊ शकतात.+
१२ याजकाच्या मुलीने याजक नसलेल्या एखाद्याशी* लग्न केलं, तर तिने पवित्र दानातलं काही खाऊ नये.
१३ पण, जर याजकाची मुलगी विधवा झाली, किंवा तिचा घटस्फोट झाला आणि तिला मुलं नसतील, आणि जर ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलांच्या घरी राहायला परत आली, तर ती आपल्या वडिलांच्या अन्नातून खाऊ शकते;+ पण अधिकार नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने* ते अन्न खाऊ नये.
१४ जर एखाद्या माणसाने पवित्र असलेलं काही चुकून खाल्लं, तर त्याने त्या पवित्र अर्पणाच्या पूर्ण भरपाईसोबतच त्याचा पाचवा भाग याजकाकडे आणून द्यावा.+
१५ इस्राएली लोकांनी यहोवासाठी दिलेल्या पवित्र गोष्टींचा याजकांनी अनादर करू नये,+
१६ आणि पवित्र अर्पणांतून खाल्ल्याच्या पापाबद्दल त्यांनी त्या लोकांना शिक्षा भोगायला लावू नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी यहोवा आहे.’”
१७ यहोवा मोशेला पुढे म्हणाला:
१८ “अहरोनला, त्याच्या मुलांना आणि सर्व इस्राएली लोकांना सांग, ‘एखादा इस्राएली किंवा इस्राएलमध्ये राहायला आलेला एखादा विदेशी जेव्हा आपले नवस फेडण्यासाठी किंवा स्वेच्छेने दिलेलं बलिदान म्हणून यहोवासाठी होमार्पण आणतो,+
१९ तेव्हा त्याने गुराढोरांपैकी, किंवा मेंढ्यांपैकी वा बकऱ्यांपैकी कोणताही दोष नसलेला नर आणावा,+ म्हणजे त्याचं अर्पण स्वीकारलं जाईल.
२० दोष असलेला कोणताही प्राणी तुम्ही अर्पण म्हणून आणू नये,+ नाहीतर तुमचं अर्पण स्वीकारलं जाणार नाही.
२१ एखाद्याने नवस फेडण्यासाठी किंवा स्वेच्छेने दिलेलं बलिदान म्हणून यहोवासाठी शांती-अर्पण आणलं,+ तर त्याने गुराढोरांच्या किंवा बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या कळपातून कोणताही दोष नसलेला प्राणी आणावा, म्हणजे त्याचं अर्पण स्वीकारलं जाईल. त्या प्राण्यात कोणताही दोष नसावा.
२२ अर्पण म्हणून आणलेला कोणताही प्राणी आंधळा, हाड मोडलेला, शरीरावर घाव असलेला किंवा चामखीळ, इसब वा नायटा झालेला असू नये. तुम्ही असे कोणतेही प्राणी यहोवासाठी आणू नका किंवा त्यांना वेदीवर यहोवासाठी अर्पण करू नका.
२३ एखाद्या बैलाचा किंवा मेंढ्याचा एखादा पाय लांब किंवा छोटा* असेल, तर तुम्ही तो प्राणी स्वेच्छेने आणलेलं अर्पण म्हणून देऊ शकता; पण, असा प्राणी नवस फेडण्यासाठी दिलेलं अर्पण म्हणून स्वीकारला जाणार नाही.
२४ एखाद्या प्राण्याच्या अंडांत दोष असेल, ते चिरडलेले असतील, किंवा काढून टाकण्यात आले असतील किंवा कापून टाकण्यात आले असतील, तर असे प्राणी तुम्ही तुमच्या देशात यहोवासाठी बलिदान म्हणून अर्पण करू नका.
२५ असे प्राणी तुम्ही एखाद्या विदेश्याकडून घेऊन तुमच्या देवाची भाकर म्हणून अर्पण करू नका, कारण त्यांच्यात दोष आणि कमतरता आहेत. अशी अर्पणं स्वीकारली जाणार नाहीत.’”
२६ यहोवा मोशेला पुढे म्हणाला:
२७ “एखादं वासरू, मेंढरू किंवा कोकरू जन्मल्यावर सात दिवस आपल्या आईजवळच राहील,+ पण आठव्या दिवसापासून तुम्ही ते यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून देऊ शकता. ते स्वीकारलं जाईल.
२८ गुराढोरांना किंवा मेंढ्यांना तुम्ही त्यांच्या पिल्लासोबत एकाच दिवशी कापू नका.+
२९ जर तुम्ही यहोवाचे आभार मानण्यासाठी अर्पण आणलं,+ तर ते स्वीकारलं जावं अशा रितीने तुम्ही ते अर्पण करा.
३० ते अर्पण त्याच दिवशी खाल्लं जावं. त्यातलं काहीही दुसरा दिवस उजाडेपर्यंत ठेवू नका.+ मी यहोवा आहे.
३१ तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजेत.+ मी यहोवा आहे.
३२ तुम्ही माझ्या पवित्र नावाचा अनादर करू नका,+ तर तुम्ही इस्राएली लोकांमध्ये मला पवित्र मानलं पाहिजे.+ मी तुम्हाला पवित्र करणारा तुमचा देव यहोवा आहे.+
३३ मीच तुमचा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं.+ मी यहोवा आहे.”
तळटीपा
^ शब्दशः “त्यांनी स्वतःला त्यांपासून वेगळं ठेवावं.”
^ किंवा “त्या जिवाला.”
^ किंवा “जिवामुळे.”
^ किंवा “जीव.”
^ शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.
^ किंवा “एखाद्या जिवाला.”
^ किंवा “एखाद्या परक्याशी.”
^ शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.
^ किंवा “आखूड; तोकडा.”