लेवीय ९:१-२४

  • अहरोन अर्पणं देतो (१-२४)

 आठव्या दिवशी+ मोशेने अहरोनला, त्याच्या मुलांना आणि इस्राएलच्या वडीलजनांना बोलावलं. २  तो अहरोनला म्हणाला: “तू स्वतःसाठी पापार्पण+ म्हणून एक गोऱ्‍हा,* तसंच होमार्पण म्हणून एक मेंढा घे आणि त्यांना यहोवासमोर आण. त्यांमध्ये कोणताही दोष नसावा. ३  पण तू इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणि होमार्पणासाठी एकेक वर्षाचा एक गोऱ्‍हा आणि एक मेंढा आणा. त्यांमध्ये कोणताही दोष नसावा. ४  तसंच, शांती-अर्पणं+ म्हणून यहोवासमोर बलिदान करण्यासाठी एक बैल आणि एक मेंढा आणा. यासोबतच तेल घातलेलं अन्‍नार्पणही+ आणा, कारण आज यहोवा तुमच्यासमोर प्रकट होईल.’”+ ५  तेव्हा मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व भेटमंडपासमोर आणलं. मग सगळे लोक येऊन यहोवासमोर उभे राहिले. ६  मोशे त्यांना म्हणाला: “यहोवाने तुम्हाला असं करण्याची आज्ञा दिली आहे, म्हणजे तुम्हाला यहोवाचं तेज पाहता येईल.”+ ७  मग मोशे अहरोनला म्हणाला: “तुझ्यासाठी+ आणि तुझ्या घराण्यासाठी प्रायश्‍चित्त म्हणून तुझं पापार्पण+ आणि होमार्पण वेदीजवळ आणून अर्पण कर. तसंच लोकांच्या+ प्रायश्‍चित्तासाठी असलेलं अर्पणही तू दे.+ यहोवाने अशीच आज्ञा दिली आहे.” ८  तेव्हा अहरोनने लगेच वेदीजवळ जाऊन त्याच्यासाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्‍हा कापला.+ ९  मग अहरोनच्या मुलांनी त्याच्याजवळ गोऱ्ह्याचं रक्‍त+ आणलं आणि त्याने आपलं बोट रक्‍तात बुडवून काही रक्‍त वेदीच्या शिंगांना लावलं. त्यानंतर त्याने उरलेलं रक्‍त वेदीच्या पायथ्याशी ओतलं.+ १०  मग यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, अहरोनने पापार्पणाची चरबी, गुरदे, तसंच यकृतावरची चरबी वेदीवर जाळली.+ ११  पण गोऱ्ह्याचं मांस आणि कातडी त्याने छावणीबाहेर जाळली.+ १२  मग त्याने होमार्पण म्हणून आणलेला पशू कापला आणि अहरोनच्या मुलांनी त्या पशूचं रक्‍त अहरोनला दिलं आणि त्याने ते वेदीच्या सभोवती शिंपडलं.+ १३  त्यांनी त्याला होमार्पणाचे तुकडे, तसंच डोकंही दिलं आणि अहरोनने ते सर्व वेदीवर जाळलं. १४  त्यानंतर त्याने आतडी आणि पाय धुऊन ते वेदीवरच्या होमार्पणावर जाळले. १५  मग त्याने लोकांसाठी असलेली अर्पणं दिली. आधी त्याने बकरा घेऊन तो कापला आणि लोकांच्या पापांसाठी तो अर्पण केला. त्याने ज्या पद्धतीने गोऱ्‍हा अर्पण केला होता, त्याच पद्धतीने हा बकरासुद्धा अर्पण केला. १६  नंतर त्याने होमार्पण आणलं आणि ते नेहमीप्रमाणे अर्पण केलं.+ १७  मग सकाळच्या होमार्पणासोबतच+ त्याने अन्‍नार्पणही आणलं+ आणि त्यातलं मूठभर घेऊन ते वेदीवर जाळलं. १८  त्यानंतर त्याने लोकांसाठी असलेल्या शांती-अर्पणाचा बैल आणि मेंढा कापला. अहरोनच्या मुलांनी त्याला त्या पशूंचं रक्‍त आणून दिलं आणि त्याने ते वेदीच्या सभोवती शिंपडलं.+ १९  पण त्यांनी बैलाची चरबी,+ मेंढ्याचं चरबीदार शेपूट, आतल्या अवयवांवरची चरबी, गुरदे आणि यकृतावरची चरबी+ घेतली, २०  आणि हे सर्व चरबीचे तुकडे त्यांनी त्या प्राण्यांच्या छातीच्या भागावर ठेवले. त्यानंतर अहरोनने ते चरबीचे तुकडे वेदीवर जाळले.+ २१  पण मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे, अहरोनने छातीचा भाग आणि उजवा पाय यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळला.+ २२  मग अहरोनने आपले हात वर करून लोकांना आशीर्वाद दिला.+ अशा रितीने पापार्पण, होमार्पण आणि शांती-अर्पणं दिल्यावर अहरोन खाली उतरला. २३  शेवटी मोशे आणि अहरोन भेटमंडपाच्या आत गेले आणि मग बाहेर येऊन त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला.+ यानंतर यहोवाचं तेज लोकांसमोर प्रकट झालं.+ २४  मग यहोवाकडून आग निघून+ वेदीवर असलेल्या होमार्पणाचे आणि चरबीचे तुकडे भस्म करू लागली. लोकांनी हे पाहिलं, तेव्हा ते जयजयकार करू लागले आणि त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं.+

तळटीपा

किंवा “तरणा बैल.”