२ राजे १९:१-३७
१९ हिज्कीया राजाने हे ऐकलं, तेव्हा दुःखी होऊन त्याने लगेच आपले कपडे फाडले आणि गोणपाट* घालून तो यहोवाच्या मंदिरात गेला.+
२ मग त्याने राजमहालाची व्यवस्था पाहणारा एल्याकीम, सचिव शेबना आणि याजकांचे प्रमुख यांना आमोजच्या मुलाकडे, म्हणजे यशया+ संदेष्ट्याकडे पाठवलं. ते सर्व गोणपाट घालून त्याच्याकडे गेले,
३ आणि यशयाला म्हणाले: “हिज्कीया असं म्हणतो, ‘आजचा हा दिवस अतिशय दुःखाचा, निंदेचा* आणि बदनामीचा दिवस आहे; कारण मुलांना जन्म द्यायची वेळ तर आली आहे, पण जन्म द्यायची ताकदच उरली नाही.+
४ ज्या रबशाकेला त्याच्या प्रभूने, अश्शूरच्या राजाने जिवंत देवाची निंदा करायला पाठवलंय,+ त्याचे शब्द कदाचित आपला देव यहोवा ऐकेल. आणि त्या शब्दांसाठी आपला देव यहोवा त्याला शिक्षा करेल. म्हणून आता या देशात उरलेल्या लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करा.’”+
५ हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले,+
६ तेव्हा यशया त्यांना म्हणाला: “तुमच्या प्रभूला सांगा: ‘यहोवा असं म्हणतो, की “अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझी निंदा केली,+ ते ऐकून तू घाबरून जाऊ नकोस.+
७ मी त्याच्या मनात एक विचार घालीन आणि तो एक बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल. नंतर त्याच्याच देशात तो तलवारीने मारला जाईल असं मी करीन.”’”+
८ मग रबशाकेने ऐकलं, की अश्शूरच्या राजाने लाखीशमधून+ आपला तळ हलवला आहे. तो त्याच्याकडे गेला, तेव्हा राजा लिब्ना शहराशी लढाई करत असल्याचा त्याला दिसला.+
९ मग अश्शूरच्या राजाला अशी खबर मिळाली, की इथियोपियाचा राजा तिऱ्हाका हा आपल्याशी लढाई करायला आलाय. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हिज्कीयाकडे परत पाठवलं.+ तो त्यांना म्हणाला:
१० “यहूदाचा राजा हिज्कीया याला जाऊन असं सांगा, ‘तुझा देव म्हणतो: “अश्शूरचा राजा यरुशलेमवर कब्जा करू शकणार नाही.” पण त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस. तो तुला फसवतोय.+
११ अश्शूरच्या राजांनी बाकीच्या सर्व देशांचा कसा नाश केला, हे तर तुला चांगलंच माहीत आहे.+ मग तू एकटाच कसा काय वाचशील?
१२ माझ्या पूर्वजांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला, त्यांचे देव तरी त्यांना वाचवू शकले का? गोजान, हारान+ आणि रेसफ ही राष्ट्रं आता कुठे आहेत? तलस्सार इथे राहणारे एदेनचे लोक कुठे आहेत?
१३ हमाथचा राजा आणि अर्पादचा राजा यांचं काय झालं? सफरवाईम, हेना आणि इव्वा+ या शहरांच्या राजाचं काय झालं?’”
१४ हिज्कीयाने दूतांच्या हातातली पत्रं घेऊन वाचली. मग तो यहोवाच्या मंदिरात गेला आणि त्याने ती पत्रं यहोवासमोर ठेवली.+
१५ तिथे हिज्कीया यहोवाला अशी प्रार्थना करू लागला:+ “हे इस्राएलच्या देवा यहोवा! तू करुबांच्या+ वर* विराजमान आहेस! तूच पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांचा खरा देव आहेस.+ आणि तूच आकाश व पृथ्वी बनवलीस.
१६ हे यहोवा, कान लावून ऐक!+ हे यहोवा, डोळे उघड आणि पाहा!+ जिवंत देवाची निंदा करणाऱ्या सन्हेरीबच्या शब्दांकडे लक्ष दे.
१७ हे यहोवा! हे खरंय, की अश्शूरच्या राजांनी राष्ट्रांचा आणि त्यांच्या जमिनींचा नाश केलाय.+
१८ आणि त्यांनी त्या राष्ट्रांच्या देवांना आगीत फेकून दिलंय. कारण ते काही खरे देव नव्हते;+ माणसांनीच बनवलेल्या त्या लाकडाच्या आणि दगडाच्या वस्तू होत्या.+ म्हणून ते त्यांचा नाश करू शकले.
१९ पण आता हे यहोवा आमच्या देवा! कृपा करून आम्हाला त्याच्या हातून वाचव; म्हणजे, हे यहोवा! पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांना कळून येईल, की फक्त तूच देव आहेस.”+
२० तेव्हा, आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला असा संदेश पाठवला: “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, की ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्याविषयी+ तू मला केलेली प्रार्थना मी ऐकली आहे.+
२१ तर आता मी, यहोवा त्याच्याविषयी असं म्हणतो:
“सीयोनची कुमारी तुला तुच्छ समजते, ती तुझी थट्टा करते.
यरुशलेमची मुलगी आपलं डोकं हलवून तुझ्यावर हसते.
२२ तू कोणाची थट्टा केलीस? कोणाची निंदा केलीस?+
तू कोणाविरुद्ध आवाज चढवून बोललास?+
गर्वाने फुगून तू कोणाकडे बघितलंस?
इस्राएलच्या पवित्र देवाकडे!+
२३ तुझ्या दूतांद्वारे+ तू यहोवाची निंदा केलीस+ आणि म्हणालास:
‘माझे असंख्य युद्ध-रथ घेऊनमी पर्वतांवर चढेन,लबानोनच्या सर्वात दूरच्या भागांत मी जाईन.
त्याची मोठमोठी देवदार वृक्षं, चांगली-चांगली गंधसरूची झाडं मी कापून टाकीन.
त्याच्या सर्वात आतल्या भागांत, घनदाट जंगलांत मी शिरेन.
२४ मी विदेश्यांच्या प्रदेशांत विहिरी खणून तिथलं पाणी पिईन;माझ्या पायांच्या तळव्यांनी मी इजिप्तचे सगळे झरे* आटवून टाकीन.’
२५ पण तू हे ऐकलं नाहीस का? मी फार पूर्वीच हे ठरवलं होतं,+खूप आधीच मी याची योजना केली होती.+
आणि आता मी ती पूर्ण करीन.+
तू तटबंदीची शहरं उद्ध्वस्त करून त्यांना दगडमातीचा ढिगारा बनवशील.+
२६ तिथे राहणारे हतबल होतील;भीतीने त्यांचा थरकाप उडेल आणि त्यांना अपमानित केलं जाईल.
ते रानातल्या झाडपाल्यासारखे होतील; हिरव्या गवतासारखे दुर्बळ होतील.+
पूर्वेकडच्या वाऱ्याने सुकून गेलेल्या छतावरच्या गवतासारखे ते होतील.
२७ पण तुझं उठणं-बसणं, तुझं येणं-जाणं,+तू कधी माझ्यावर क्रोधित होतोस, हे सगळं मला माहीत आहे.+
२८ तू माझ्यावर भडकलास+ आणि तुझी डरकाळी माझ्या कानांपर्यंत पोहोचली;+म्हणून आता मी तुझ्या नाकात माझी वेसण, आणि तुझ्या तोंडात माझा लगाम घालीन.+
आणि ज्या रस्त्याने तू आलास, त्याच रस्त्याने मी तुला परत मागे घेऊन जाईन.”+
२९ आणि तुझ्यासाठी* हे चिन्ह असेल: या वर्षी तुम्ही आपोआप उगवलेलं* धान्य खाल; आणि दुसऱ्या वर्षी त्यातून अंकुरलेलं धान्य खाल.+ पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही धान्याची पेरणी आणि कापणी कराल. तसंच, तुम्ही द्राक्षमळे लावाल आणि त्यांचं फळ खाल.+
३० यहूदाच्या घराण्यातले जे वाचतील,+ ते झाडाप्रमाणे खोलवर मूळ धरतील आणि फळ देतील.
३१ कारण उरलेले लोक यरुशलेममधून बाहेर निघतील, आणि बचावलेले सीयोन डोंगरातून बाहेर पडतील. सैन्यांचा देव यहोवा आपल्या आवेशामुळे हे घडवून आणेल.+
३२ अश्शूरच्या राजाविषयी यहोवा असं म्हणतो:+
“तो या शहरात येणार नाही,+तो एक बाणसुद्धा मारणार नाही,किंवा ढाल घेऊन सामना करणार नाही,आणि वेढा घालण्यासाठी दगडमातीचा ढिगाराही रचणार नाही.+
३३ ज्या रस्त्याने तो आलाय, त्याच रस्त्याने तो परत मागे जाईल.
तो या शहरात पाऊलसुद्धा ठेवू शकणार नाही,” असं यहोवा म्हणतो.
३४ “माझ्या नावासाठी,+ आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी,+मी या शहराचं रक्षण करीन+ आणि ते वाचवीन.”’”
३५ त्याच रात्री यहोवाच्या स्वर्गदूताने जाऊन अश्शूरी लोकांच्या छावणीतल्या १,८५,००० सैनिकांना ठार मारलं.+ मग लोक पहाटे उठले, तेव्हा त्यांना सगळीकडे मृतदेह पडलेले दिसले.+
३६ त्यामुळे अश्शूरचा राजा सन्हेरीब परत निनवेला+ निघून गेला आणि तिथेच राहिला.+
३७ एकदा सन्हेरीब राजा, निस्रोख या आपल्या दैवताच्या मंदिरात नमन करत होता. तेव्हा अद्रम्मेलेक व शरेसर या त्याच्या मुलांनी त्याला तलवारीने ठार मारलं.+ त्यानंतर ते अरारात+ देशात पळून गेले. आणि त्याचा मुलगा एसर-हद्दोन+ हा त्याच्या जागी राजा बनला.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “अपमानाचा.”
^ किंवा कदाचित, “करुबांच्या मधे.”
^ किंवा “नाईल नदीचे कालवे.”
^ किंवा “खाली पडलेल्या धान्यातून उगवलेलं.”
^ म्हणजे, हिज्कीया.