योहान याचं तिसरं पत्र १:१-१४

  • नमस्कार आणि प्रार्थना (१-४)

  • गायसची प्रशंसा (५-८)

  • महत्त्वाकांक्षी दियत्रफेस (९, १०)

  • देमेत्रियबद्दल बांधव चांगलं बोलतात (११, १२)

  • भेटण्याची योजना आणि नमस्कार (१३, १४)

१  एका वडिलाकडून,* प्रिय गायस याला, ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करतो. २  प्रिय बांधवा, आता जसं तुझं सगळं व्यवस्थित चाललं आहे, तसंच पुढेही चालावं आणि तुला चांगलं आरोग्य लाभावं, अशीच माझी प्रार्थना आहे. ३  सत्याच्या मार्गावर चालत असताना तू कशा प्रकारे सत्याला धरून राहिला आहेस, हे बांधवांनी येऊन मला सांगितलं तेव्हा मला खूप आनंद झाला.+ ४  माझी मुलं सत्याच्या मार्गावर चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो,* तितका दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीने होत नाही.+ ५  प्रिय बांधवा, अनोळखी असलेल्या बांधवांसाठीही, तू जे काही करतोस त्यातून तुझा विश्‍वासूपणा दिसून येतो.+ ६  तू दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी मंडळीसमोर साक्ष दिली आहे. कृपा करून, जाताना त्यांना देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल अशा पद्धतीने निरोप दे.+ ७  कारण ते त्याच्याच नावाने बाहेर पडले आणि जगातल्या लोकांकडून त्यांनी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही.+ ८  त्यामुळे, अशा बांधवांचा पाहुणचार करणं हे आपलं कर्तव्यच आहे.+ असं केल्यामुळे आपण सत्यात त्यांचे सहकारी बनू.+ ९  मी मंडळीला काही गोष्टी लिहिल्या; पण, इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करणारा दियत्रफेस+ आम्ही सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची कदर करत नाही.+ १०  म्हणूनच, मी जर आलो तर त्याची कार्यं उघड करीन. कारण तो आमची बदनामी करण्यासाठी आमच्याबद्दल वाईट बोलतो.*+ शिवाय, एवढ्यानेच त्याचं समाधान होत नाही. तो स्वतः तर बांधवांचं आदराने स्वागत करतच नाही,+ पण ज्यांना असं करायची इच्छा आहे त्यांनाही तो अडवायचा आणि मंडळीतून बहिष्कृत करायचा प्रयत्न करतो. ११  प्रिय बांधवा, वाइटाचं अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचं अनुकरण कर.+ जो चांगलं करतो तो देवापासून आहे.+ पण, जो वाईट करतो त्याने देवाला पाहिलेलं नाही.+ १२  देमेत्रिय याच्याबद्दल सगळे बांधव चांगलंच बोलले आहेत आणि तो सत्यात ज्या प्रकारे चालत आहे, त्यावरूनही ही गोष्ट खरी असल्याचं दिसून येतं. खरंतर, आम्हीसुद्धा त्याच्याबद्दल साक्ष देत आहोत, आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला माहीत आहे. १३  मला आणखी बऱ्‍याच गोष्टी तुला लिहायच्या होत्या. पण, मला त्या लेखणीने आणि शाईने लिहायच्या नाहीत. १४  तर, तुला प्रत्यक्षात भेटून तुझ्याशी बोलायची माझी इच्छा आहे. तुला शांती असो. सगळे मित्र तुला नमस्कार सांगतात. तिथल्या मित्रांना ज्याच्या त्याच्या नावाने माझा नमस्कार सांग.

तळटीपा

शब्दशः “वडीलधाऱ्‍या माणसाकडून.”
किंवा कदाचित, “जितकं कृतज्ञ वाटतं.”
शब्दशः “दुष्ट गोष्टी बोलून वटवट करतो.”